(पिंपरी, ता. ३० ): जगभरात सांस्कृतिक विसंवाद वाढत असताना जगात, देशात आणि प्रत्येकाच्या मनात शांतता नांदण्यासाठी बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आणि महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाली-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन बुधवारी (दि. ३०) महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सबनीस बोलत होते.
या वेळी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. अशोककुमार पगारिया, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (उच्चशिक्षण) प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्यसेवा पुरस्कार, तर पिंपरी-चिंचवड महापालिका सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर यांना लोकशिक्षक बाबा भारती स्नेहबंध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, कर्मवीर भाऊराव अण्णांची कार्यसंस्कृती बहुधार्मिक होती. या पार्श्वभूमीवर बाबा भारती प्रतिष्ठानकडून सांस्कृतिक समन्वयासाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्य आहेत.
डॉ. अशोककुमार पगारिया यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी मागणी केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी कोणताही पुरस्कार हा व्यक्तीचा नसून त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचा सन्मान असतो, असे मत व्यक्त केले.
पुरुषोत्तम सदाफुले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतील आपण विद्यार्थी असल्याचे सांगत हा पुरस्कार आपल्या आईला समर्पित केला. प्रकाश जवळकर यांनी धर्म, जात आणि भाषा यापासून दूर राहून केलेल्या निरपेक्ष कार्याचा हा सन्मान असल्याचे नमूद केले.
प्रतिमापूजन आणि सुभाष चव्हाण यांच्या शंखवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र भारती, रमेश ढाले, विजय कांबळे, निमिष भारती, अप्पा देशमुख, शार्दूल भारती, अमोल ढाले, हंबीरराव पाटील, जय भारती, राजरत्न गाडे, सचिन कांबळे, आनंदा कांबळे, अनिकेत गाडे, अभिजित भोसले, उपप्राचार्या प्रा. डॉ. संगीता अहिवळे आणि उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास निंबाळकर यांनी संयोजनासाठी सहकार्य केले. उपप्राचार्या प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. संग्राम गोसावी यांनी आभारDr Shripal Sabnis )मानले.





