(पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि ‘भूमिका’ या दोन वैविध्यपूर्ण नाटकांचे सादरीकरण झाले.
दुपारच्या सत्रात संतोष पवार लिखित व दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकातून दोन कुटुंबांतील नातेसंबंध, प्रेम, लग्न आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी प्रसंग रंगमंचावर साकारण्यात आले. पात्रांच्या वैशिष्ट्यांमुळे निर्माण होणारे गैरसमज आणि संवादांमुळे प्रेक्षकांना मनमुराद हसता आले. कुटुंबातील व्यक्तींच्या उणिवा स्वीकारून प्रेम आणि आपलेपणा जपण्याचा संदेशही नाटकातून देण्यात आला.
सायंकाळच्या सत्रात क्षितिज पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाने रसिकांना गंभीर आणि वैचारिक अनुभव दिला. ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या प्रभावी अभिनयाने नाटक विशेष गाजले. सामाजिक समता, अस्मिता, संविधानिक मूल्ये आणि मानवी नातेसंबंध यांसारखे विषय वैयक्तिक व कौटुंबिक संघर्षाच्या माध्यमातून मांडण्यात आले. कलाकारांच्या अभिनयाला आणि नाटकाच्या आशयाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
रात्रीच्या सत्रात लोकजागर ॲक्टिव्हिटीजतर्फे ‘सणयात्रा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. मराठी पंचांगातील विविध सण, त्यांच्या परंपरा आणि कथांचा परिचय नृत्य व संगीताच्या माध्यमातून करून देण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
बुधवारी विविध कार्यक्रम
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे दुपारी १२.३० वाजता ‘फोक लावणी’ (महिलांसाठी), सायंकाळी ५.३० वाजता भाऊ कदम अभिनीत ‘पहिली लग्नाची दुसरी प्रेमाची’ आणि रात्री ९.३० वाजता ‘स्वर मराठी मनाचा’ कार्यक्रम होणार आहे.
नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी येथे दुपारी १२.३० वाजता ‘लावण्यरंग’ (महिलांसाठी), सायंकाळी ५ वाजता ‘गझलभाव’ आणि रात्री ८ वाजता स्वप्नील जोशी व विदुला चौगुले अभिनीत ‘लग्नपंचमी’ नाटक होईल.
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे सकाळी १० वाजता कवी संमेलन, दुपारी १२.३० वाजता ‘गंध मराठी कलेचा’, दुपारी ३ वाजता ‘मराठी साहित्याचे विश्व’ या विषयावर चर्चासत्र आणि सायंकाळी ५.३० वाजता शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार आहे.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे सकाळी ९ वाजता महापालिका शाळांची समूह नृत्य स्पर्धा, तर रात्री ७ वाजता लोकगायक नंदेश विठ्ठल उमप यांचा ‘मी मराठी’ हा लोककला सोहळा होणार आहे.
