(पिंपरी ): मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (एनएच-४) रावेत येथील मुकाई चौक पुलावर टायर बनवण्यासाठी लागणारे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. टायर अति-उष्णतेमुळे फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत टँकरचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, क्लीनर जखमी झाला आहे.
मुख्य अग्निशमन केंद्राला रात्री २.३३ वाजता टँकरला आग लागल्याची वर्दी मिळाली. त्यानंतर प्राधिकरण उप-अग्निशमन केंद्राचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. टँकर (केए ३५ बी ८३०८) आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. अग्निशमन जवानांनी तत्परतेने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. पीएमआरडीए अग्निशमन दलाचे एक वाहनही मदतीसाठी दाखल झाले.
टायर फुटल्याने टँकरचा क्लीनर मुस्लिम अबित्तालिम किरकोळ जखमी झाला असून, त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या वेळी सिनिअर फायरमन भूषण येवले, फायरमन सुरेश काटे, इरफान बेलदार, निखिल जाधव, वाहनचालक आकाश थोरात, प्रतीक अहिरेकर आणि टी. एफ. श्री फडतरे यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित होते.
