(पिंपरी-चिंचवड) : वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून व्यावसायिकावर दगडाने हल्ला, हॉटेलच्या बिलावरून मित्राच्या गालावर कटरने वार, दुकान आणि घरफोडी, ज्येष्ठ महिलेची सुमारे १.७० कोटींची सायबर फसवणूक, तसेच विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक, अशा विविध गुन्ह्यांच्या घटना पिंपरी-चिंचवड आणि परिसरात उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही आरोपींना अटक करण्यात आली (PCMC Crime News)आहे.
वाहनाच्या कारणावरून व्यावसायिकावर दगडाने हल्ला
मोशीतील संजय गांधीनगर परिसरात गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात गणेश रावसाहेब लोंढे (वय ४७) या व्यावसायिकाच्या डोक्यावर दगडाने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिरामागे ही घटना घडली. याप्रकरणी आकाश शशिकांत तावडे (वय ३५, रा. मोशी) याच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली (PCMC Crime News)आहे.
हॉटेलच्या बिलावरून मित्राच्या गालावर कटरने वार
खराबवाडीतील कडवस्ती परिसरात हॉटेलच्या ३०० रुपयांच्या बिलावरून झालेल्या वादात अमर संतोष नायक (वय २१) याने मित्र प्राशु अच्छेलाल रावत यांच्या डाव्या गालावर कटरने वार करून त्यांना जखमी केले. १३ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास किराणा दुकानासमोर ही घटना घडली. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी नायक याला अटक केली (PCMC Crime News)आहे.
जयबाबा मार्केटमधील दुकान फोडून ११ हजारांची चोरी
पिंपरीतील मुख्य बाजारपेठेतील जयबाबा मार्केटमधील दुकानाचे शटर उचकटून ११ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली. १३ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहा ते १४ ऑक्टोबरच्या सकाळी आठ या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी महेश शामलाल छाबा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीच्या घटनेत तीन विधिसंघर्षित बालकांचा सहभाग असल्याची नोंद पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू (PCMC Crime News)आहे.
ज्येष्ठ महिलेची १ कोटी ६९ लाखांची सायबर फसवणूक
दूरसंचार विभाग आणि मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेची भीती दाखवत सायबर चोरट्यांनी बावधन येथील ७६ वर्षीय निवृत्त महिलेची १ कोटी ६९ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केली. २० ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आरोपींनी महिलेशी संपर्क साधला. बँक खात्यांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने विविध खात्यांत पैसे जमा करण्यास सांगितले. बनावट कागदपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचा वापर करून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी राम शर्मा, विजय खन्ना आणि संबंधित बँक खात्यांच्या धारकांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (PCMC Crime News)आहे.
जुनी सांगवीत घरातून सोन्याचे दागिने चोरीला
जुनी सांगवीतील सातपुडा हौसिंग सोसायटी परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते १० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा या कालावधीत ही घटना घडली. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू(PCMC Crime News) आहे.
पिंपरीत देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त
पिंपरीतील नेहरूनगर परिसरात आण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील बंद वसतिगृहाच्या परिसरातून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. या शस्त्रांची एकूण किंमत ५१ हजार रुपये आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दीपक भास्कर बर्फे (वय २६, रा. पिंपळे गुरव) याला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली. घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असलेल्या कालावधीत विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली (PCMC Crime News)आहे.
या सर्व प्रकरणांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू (PCMC Crime News)आहे.
