साठवणीतली गाणी:पुष्प १५ वे
आदिमाया अंबाबाई
सृजनमनाच्या रसिकजनहो, नमस्कार! 🙏🙏 कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवे जीवन! सर्वप्रथम, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! साऱ्या जगताची आई अंबाबाईची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच प्रार्थना. 🙏🙏 याच निमित्ताने आजच्या पंधराव्या भागातील खास साठवणीतले गाणे आहे, ‘आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई!’ किती सुंदर आणि महान कल्पना आहे ना ही! साऱ्या दुनियेची आई माझी (Marathi Nostalgic Songs)अंबाबाई!
आपण भारतीय लोक विलक्षण श्रद्धाळू आहोत. श्रद्धा आपल्या जीवनात असायलाच हवी. त्यामुळे जगण्याची इच्छा वाढते, मनाला बळ मिळते आणि संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्यही मिळते. हे गीतसुद्धा त्याच श्रद्धेतून आलेले आहे. मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेल्या भक्तिसंगीताच्या लेण्यांपैकी एक अनमोल लेणे म्हणजे ‘थोरली जाऊ’ (१९८२–८३) या चित्रपटातील हे अजरामर गीत. नवरात्रोत्सव असो किंवा देवीचा कोणताही धार्मिक सोहळा, हे गाणे ऐकू आले की वातावरणात एक वेगळाच भक्तिभाव निर्माण होतो. गीतकार सुधीर मोघे, संगीतकार सुधीर फडके, अर्थात आपले लाडके बाबूजी, आणि आपल्या सुमधुर आवाजाने या गीताला अजरामर करणाऱ्या आशा भोसले! या दिग्गजांच्या कलाविष्कारातून साकारलेले हे गीत आजही तितकेच ताजेतवाने आणि मनाला भावणारे (Marathi Nostalgic Songs)आहे.
सुधीर मोघे यांच्या शब्दांमधून अंबाबाईच्या रूपाचे जे दर्शन घडते, ते विलक्षण आहे. एकीकडे साऱ्या चराचराला जीवन देणारी, आपल्या लेकरांवर वात्सल्याचा वर्षाव करणारी जगन्माता, तर दुसरीकडे दुष्टांचा संहार करण्यासाठी उग्रचंडीचे रूप धारण करणारी आदिशक्ती! आईच्या या दोन्ही रूपांचे सुंदर दर्शन या गीतातून घडते. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे महात्म्य असो किंवा तुळजापूरच्या भवानी मातेचे आदिशक्ती म्हणून असलेले स्थान असो, गीतकाराने मोजक्या शब्दांत या श्रद्धास्थानांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई’ ही भावना भक्ताच्या मनातील श्रद्धा किती उत्कट असते, हे सांगून जाते. संगीतकार बाबूजी यांनी या गीताला दिलेली चाल आणि त्यातील पारंपरिक भक्तिसंगीताचा बाज मनाचा ठाव घेतो. ढोलकी, झांजा आणि तालाच्या साथीने गाण्याला मिळणारी गती वातावरणात चैतन्य निर्माण करते. आशाताईंच्या आवाजातील आर्तता, भक्तिभाव आणि ऊर्जा यांचा संगम या गीताला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. ‘उदे गं अंबाबाई!’ हा पुकारा कानावर पडला की मन नकळत भक्तिरसात चिंब होऊन जाते. म्हणूनच हे गाणे केवळ चित्रपटगीत न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग बनले (Marathi Nostalgic Songs)आहे.
रसिकहो, माझी आई फारशी शिकलेली नाही; पण तिचे वाचन आणि पाठांतर अफाट आहे, केवळ अफाट! आजही वयाच्या ऐंशीपार ती मनाने आणि शरीराने सुदृढ आहे. अपवाद फक्त माझे वडील, म्हणजेच तिचे ‘अहो’, गेल्यामुळे आलेल्या काहीशा नैराश्याचा. पण तिचे पाठांतर आजही मनाला हेवा वाटावा असेच आहे. आपल्याला काल काय घडले, हे आठवत नाही; पण ती साठ वर्षांपूर्वीच्या गोष्टी अगदी डोळ्यांसमोर घडत असल्याप्रमाणे सहजतेने सांगते. तिची देवीवर विलक्षण श्रद्धा आहे. त्यामुळेच हे गाणे मलाही तितकेच भावते. तिच्या श्रद्धेतून, तिच्या आठवणींतून आणि तिच्या जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून मला या गाण्याचा अर्थ अधिक जवळचा वाटतो. काही गाणी केवळ कानांना आनंद देत नाहीत, तर ती आपल्या आयुष्यातील माणसांशी, त्यांच्या आठवणींशी आणि आपल्या भावविश्वाशी जोडली जातात. ‘आदिमाया अंबाबाई’ हे माझ्यासाठी असेच एक गाणे आहे. ते ऐकताना अंबाबाईच्या रूपाबरोबरच माझ्या आईचे श्रद्धाळू मनही डोळ्यांसमोर उभे(Marathi Nostalgic Songs) राहते.

खरं सांगू का, रसिकहो, माझ्या वैयक्तिक आयुष्यात इतकी स्थित्यंतरे आली आहेत की कधी कधी वाटते, मी जगातला सर्वांत दुर्भाग्याचा शाप भोगणारा दुःखी जीव आहे! पण प्रत्येक शापाला उःशाप असतो, असे म्हणतात ना! तसा देवाने मला माझ्या आई-वडिलांचा, किमान त्यांच्या उतारवयात तरी, सहवास लाभण्याचा आशीर्वाद दिला. यामुळेच माझ्या मनातील देवाविषयीचा राग काहीसा कमी झाला आहे. 😄😄 नाही तरी आपण देवाला फक्त कामापुरतेच आठवतो; मग मी तरी त्याला अपवाद कसा असेन? मी काही विरक्त साधू नाही! 😄😄 कुठेतरी वाचण्यात आले होते की, मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या आणि गाभाऱ्यात देवासमोर हात जोडून उभे राहून काहीतरी मागणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या मनोवृत्तीत फारसा फरक नसतो. खरंच आहे की! प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही मागत असतो. कुणाला सुख हवे असते, कुणाला समाधान, कुणाला संकटांतून बाहेर पडण्याचा मार्ग, तर कुणाला आपल्या माणसांचे सुख आणि आरोग्य. माझ्यासारखा सामान्य माणूस तरी याला अपवाद कसा असेल? आयुष्याच्या वाटेवर कितीही संकटे आली, तरी कुठेतरी एखादा आशेचा किरण दिसतो आणि पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळते. कदाचित हीच श्रद्धेची ताकद(Marathi Nostalgic Songs) असावी!
साऱ्या जगताची आई असलेल्या अंबाबाईकडे आज माझे एकच मागणे आहे. माझ्या आईची पतवंडे तिच्या मांडीवर खेळोत आणि तिला तिच्यातील आई, आजी, पणजी या तिन्ही भूमिका मनमुराद जगता येवोत. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान, तिच्या डोळ्यांतील आनंद आणि तिच्या सहवासातील प्रेम असेच कायम राहो, हीच जगन्मातेच्या चरणी प्रार्थना! 🙏🙏 पुन्हा भेटू, पुन्हा पुन्हा भेटू, अशाच साठवणीतल्या अजरामर गाण्यांसह! तोवर ऐकत रहा आणि वाचत रहा… ‘साठवणीतली (Marathi Nostalgic Songs)गाणी’!
तुमचाच,
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
