(पिंपरी-चिंचवड ): रावेत येथे प्रस्तावित २७ मेगावॅट क्षमतेच्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पावरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निगडी प्राधिकरण, रावेत आणि परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाच्या जागेची निवड, संभाव्य प्रदूषण, जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षितता तसेच पर्यायी जागांच्या उपलब्धतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. विकासाला विरोध नसून तो नागरिकांच्या आरोग्याची आणि पर्यावरणाची सुरक्षितता जपूनच व्हावा, अशी भूमिका घेत या प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाने पारदर्शक भूमिका मांडावी, अशी मागणी पुढे येत येत (Ravet WasteToEnergy)आहे.
‘रावेतच का?’; नागरिकांचा प्रशासनाला सवाल
प्रस्तावित प्रकल्पासाठी रावेतमधील सुमारे २५ एकर जागेची निवड करण्यात आल्याचे नमूद करत, निवासी परिसराच्या जवळच हा प्रकल्प उभारण्यामागील नेमकी तांत्रिक, पर्यावरणीय आणि प्रशासकीय कारणे काय आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. निगडी प्राधिकरणची निवासी वस्ती, दुर्गा टेकडीचा नैसर्गिक परिसर आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या जवळ प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा कितपत विचार झाला, याबाबतही स्पष्टीकरण मागण्यात येत (Ravet WasteToEnergy)आहे.
महापालिकेकडे अन्य पर्यायी जागा उपलब्ध असताना रावेतचीच निवड का करण्यात आली? सर्व संभाव्य जागांचा तुलनात्मक अभ्यास झाला आहे का? हा अभ्यास झाला असल्यास त्याचा अहवाल नागरिकांसाठी सार्वजनिक करणार का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले(Ravet WasteToEnergy) आहेत.
मोशीतील अनुभवातून काय धडा घेतला?
मोशी कचरा डेपो परिसरातील दुर्गंधी, पाणीप्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रावेतमधील प्रस्तावित प्रकल्पाबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. मोशीतील समस्यांची कारणे शोधून त्यावर कोणते ठोस उपाय करण्यात आले, विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी दूर झाल्या आहेत का आणि नव्या प्रकल्पात अशा समस्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाणार आहे, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी होत (Ravet WasteToEnergy)आहे.
हवा, पाणी आणि वृक्षसंपदेच्या सुरक्षिततेचे काय?
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पामुळे संभाव्य हवा प्रदूषण, दुर्गंधी, धूळ, वाहतुकीचा वाढता भार आणि आवाज यांचा परिसरावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक असल्याचे मत मांडण्यात येत आहे. तसेच परिसरातील वृक्षसंपदा, जैवविविधता, माती आणि भूजल यांचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले आहे का, याबाबतही प्रश्न विचारण्यात आले (Ravet WasteToEnergy)आहेत.
प्रकल्पामुळे पर्यावरणीय हानी किंवा प्रदूषण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार? नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी नेमके कोणते निकष आणि देखरेख व्यवस्था असेल? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने स्पष्टपणे द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत(Ravet WasteToEnergy) आहे.
PCMC आयुक्तांना पाच थेट प्रश्न
१. निवासी वस्ती, दुर्गा टेकडी आणि जलशुद्धीकरण केंद्राजवळील जागेची निवड नेमक्या कोणत्या निकषांवर करण्यात आली?
२. महापालिकेकडे अन्य जागांचे पर्याय असताना रावेतचीच निवड का? पर्यायी जागांच्या तुलनात्मक अभ्यासाचा अहवाल सार्वजनिक करणार का?
३. मोशीतील कचरा व्यवस्थापनाशी संबंधित तक्रारींमधून कोणते धडे घेतले आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी काय उपाय केले?
४. वृक्षसंपदा, जैवविविधता, भूजल आणि पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचे स्वतंत्र मूल्यांकन झाले आहे का? प्रदूषण झाल्यास जबाबदारी कोणाची असेल?
५. पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास, आवश्यक परवानग्या आणि अन्य संबंधित अहवाल सार्वजनिक करून नागरिकांचे म्हणणे ऐकेपर्यंत प्रकल्पाची पुढील कार्यवाही स्थगित ठेवणार का?
‘विकास हवा; पण आरोग्याच्या किमतीवर नको!’
प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम किंवा भीती निर्माण होण्याऐवजी प्रशासनाने सर्व तांत्रिक माहिती, पर्यावरणीय अभ्यास, आवश्यक परवानग्या आणि पर्यायी जागांच्या तुलनात्मक अहवालाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या शंका ऐकण्यासाठी खुली बैठक आयोजित करून त्यांच्या सूचनांचा विचार करावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत (Ravet WasteToEnergy)आहे.
रावेत, निगडी प्राधिकरण आणि परिसरातील नागरिकांनी या विषयावर एकत्र येऊन जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष पर्यावरणीय परिणाम कोणते असतील, याचा निष्कर्ष अभ्यास आणि अधिकृत अहवालांच्या आधारेच निघणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व माहिती पारदर्शकपणे समोर आणून नागरिकांचा विश्वास संपादन करण्याची जबाबदारी आता महापालिका प्रशासनावर(Ravet WasteToEnergy) आहे.
‘आपला परिसर, आपले आरोग्य, आपली जबाबदारी’ या भूमिकेतून नागरिकांनी प्रश्न विचारावेत आणि जबाबदार विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात येत (Ravet WasteToEnergy)आहे.
