नाना नावाचा माणूस!
सकाळी सकाळी सायलीने बातमी दिली—
“नाना पाटेकर गेले…”
क्षणभर माझा विश्वासच बसला नाही.
मी म्हणालो, “अगं, हल्ली कुणाचंही नाव घेऊन अफवा पसरवतात. तसं काहीतरी असेल.”
सायली म्हणाली, “मला ही बातमी एका अत्यंत जबाबदार समूहावर आली आहे. ते उगाच अशी बातमी देणार नाहीत.”
थोड्याच वेळात अनिकेतनेही त्या बातमीची पुष्टी केली. त्यानंतर वेगवेगळ्या समूहांवर नानांचा फोटो, निधनाची बातमी आणि भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश धडकू लागले.
मग मात्र मनाने ती बातमी स्वीकारली.
का माहिती नाही, पण नाना मला उगाचच जवळचे वाटायचे.
त्यामागे एक मजेशीर कारण होतं. माझ्या वडिलांना सगळे “नाना काटेकर” म्हणायचे. त्यामुळे “नाना काटेकर” आणि “नाना पाटेकर” यांच्यातलं हे यमकाचं नातं आणि त्यातून नकळत निर्माण झालेला एक आपलेपणा!
नाना पाटेकर हे एक वेगळंच रसायन होतं.
सुरुवातीपासूनच सडेतोड, बिनधास्त, परखड. कुणाची भीडभाड न ठेवता मनातलं बोलणारे.
बॉलीवूडच्या टिपिकल पठडीत न बसणारे. पारंपरिक अर्थाने हिरो मटेरियल नसलेले. देखणेपणा, नायकासारखं रूप किंवा चकचकीत व्यक्तिमत्त्व यापेक्षा त्यांच्याकडे होता तो राकट चेहरा, डोळ्यांतला रोख आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबरदस्त आवाज आणि अभिनयाची ताकद.
सगळ्या प्रस्थापित बॉलीवूड हिरोंसमोरही नाना कधी खुजे वाटले नाहीत. मराठी नट हे केवळ दुय्यम भूमिकांसाठीच जन्माला आले आहेत, अशी मानसिकता आणि त्यातून होणारी उपेक्षा त्यांच्या वाट्याला आली नाही. उलट, आपल्या अभिनयाच्या ताकदीने त्यांनी सिद्ध केलं की प्रतिभेला भाषा, प्रांत किंवा चित्रपटसृष्टीच्या चौकटी अडवू शकत नाहीत.
नानांबद्दल आदर वाटण्याचं हेही एक महत्त्वाचं कारण.
म्हणूनच तो पडद्यावर दिसला की आश्वासक वाटायचं—
हा आपल्यातलाच कुणीतरी आहे.
माझं सिनेमे समजण्याचं वय सुरू झालं तेव्हा पाहिलेला नानांचा एक चित्रपट म्हणजे ‘सिंहासन’.
राजकारणाच्या अंतर्गत घडामोडी, सत्तासंघर्ष आणि सामान्य माणसापासून दूर चाललेलं सत्तेचं राजकारण मांडणाऱ्या या चित्रपटातील नानांची भूमिका मोठी नव्हती; पण दिग्गजांच्या मांदियाळीतही त्यांची उपस्थिती लक्षात राहिली.
नंतर आला ‘अंकुश’.
बेरोजगारी, अन्याय आणि व्यवस्थेच्या कचाट्यात अडकलेल्या तरुणाच्या मनातला संताप त्यांनी ताकदीने मांडला. तो फक्त अभिनय नव्हता; तो अस्वस्थ तरुण जणू त्यांच्या अंगात संचारला होता.
त्यानंतर नानांचा प्रवास पाहताना एक गोष्ट कायम जाणवत राहिली—
हा माणूस अभिनय करत नाही; भूमिका जगतो.
‘प्रतिघात’, ‘सलाम बॉम्बे’, ‘परिंदा’ अशा चित्रपटांतून त्यांची ओळख अधिक ठसत गेली.
‘परिंदा’मधला अण्णा आठवला की नानांचा अभिनय किती वेगळ्या पातळीवरचा होता, हे जाणवतं. खलनायक असूनही ती व्यक्तिरेखा केवळ वाईट म्हणून लक्षात राहत नाही. तिची भीती, क्रूरता आणि व्यक्तिमत्त्व—सगळं नानांनी आवाज आणि देहबोलीतून उभं केलं.
नानांचा पाया मात्र रंगभूमीवरचा.
विजया मेहता यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या सहवासातून त्यांना रंगभूमीची शिस्त, अभिनयातील बारकावे आणि व्यक्तिरेखेत शिरून जगण्याची दृष्टी मिळाली.
‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’सारख्या नाटकांतून त्यांनी रंगभूमीवर आपली ताकद दाखवली.
रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत काम करताना नानांनी लोकप्रियतेच्या मागे धावण्यापेक्षा भूमिकेची ताकद आणि गरज महत्त्वाची मानली. त्यामुळेच त्यांच्या वाट्याला हिरो, खलनायक, पोलीस, सैनिक, राजकारणी, सामान्य माणूस अशा विविध भूमिका आल्या.
‘प्रहार’ हा त्यांच्या कारकिर्दीतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा.
सैनिकाची भूमिका साकारण्याबरोबरच त्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं. शिस्त, देशसेवा आणि सैनिकाच्या कठोर प्रशिक्षणामागची मानसिकता त्यांनी प्रभावीपणे मांडली. या भूमिकेसाठी त्यांनी कमांडो प्रशिक्षण घेतल्याचंही सांगितलं जातं.
नंतर ‘क्रांतिवीर’ आला आणि नाना घराघरात पोहोचले. प्रताप नारायण तिळक हा संतप्त, व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा माणूस लोकांच्या लक्षात राहिला.
‘अब तक छप्पन’मधला साधा पण कठोर पोलीस अधिकारी, ‘राजनीती’मधला राजकीय चेहरा आणि दुसरीकडे ‘वेलकम’मधला उदय शेट्टी—नानांच्या अभिनयाची व्याप्ती किती मोठी होती, याची ही काही उदाहरणं.
आणि मग आला ‘नटसम्राट’.
गणपतराव बेलवलकर साकारताना नानांनी रंगभूमीवर कमावलेलं सगळं जणू त्या भूमिकेत ओतलं.
एकेकाळी टाळ्यांचा कडकडाट मिळवणारा कलाकार आयुष्याच्या उत्तरार्धात एकटा पडतो, मुलांपासून दुरावतो आणि स्वतःच्या आठवणींमध्ये जगतो—ही वेदना नानांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली.
नानांनी अनेक चित्रपट केले. अनेक भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं देण्याचा त्यांचा प्रयत्न जाणवला.
नानांचं आयुष्य मात्र केवळ अभिनयापुरतं मर्यादित राहिलं नाही.
ते स्वतः शेतकरी झाले. शेतात राबले. निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची त्यांची आस्था आणि जनजागृतीची भूमिका कायम जाणवली.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती, दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांचं दुःख त्यांनी जवळून पाहिलं.
मकरंद अनासपुरे यांच्या सहकार्याने ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मदत, गावांच्या विकासासाठी काम अशा अनेक उपक्रमांत त्यांनी सहभाग घेतला.
नानांचा उल्लेख करताना ‘नाम’चा उल्लेख केला नाही, तर तो कृतघ्नपणा ठरेल.
फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष गावात जाऊन काहीतरी भरीव करून पाहणं त्यांनी पसंत केलं.
नाना डोळस आस्तिक होते; पण भक्तीचं प्रदर्शन त्यांनी कधी मांडलं नाही. त्यांची राजकीय मतं परखड होती आणि अनेकदा वादग्रस्तही ठरली. त्यांची बोलण्याची पद्धतही सगळ्यांना आवडेल अशी नव्हती.
२०१८ मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. त्यानंतर ‘मी टू’च्या संदर्भात मोठा वाद निर्माण झाला.
हे त्यांच्या आयुष्यातलं एक गालबोट ठरलं.
खरं-खोटं नानाच जाणोत. मात्र अशा आरोपांच्या आधारे एखाद्या माणसाला पूर्णपणे एका चौकटीत बसवणंही योग्य ठरणार नाही.
शेवटी नाना त्यांच्या गुणदोषांसह एक माणूस होते.
त्यांना २०१३ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर आणि इतर अनेक पुरस्कारांनी त्यांच्या अभिनयाचा गौरव झाला.
पण माझ्यासाठी त्यांच्या पुरस्कारांची यादी फार महत्त्वाची नाही.
मला आठवतो तो त्यांचा आवाज.
पडद्यावरचा त्यांचा राग.
व्यक्त होण्याची त्यांची पद्धत.
एखाद्या संवादातला थांबा.
डोळ्यांतला रोख.
आणि पडद्यावर दिसताना जाणवणारा तो आपलेपणा.
नाना पाटेकर गेलेले नाहीत.
एक अभिनेता त्याच्या कामातून पडद्यावर दिसत राहणार आहे.
एक रंगकर्मी स्मरणात राहणार आहे.
एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं योगदान नोंदलेलं आहे.
समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेला एक समाजसेवक त्याच्या कार्यातून आठवला जाणार आहे.
पण माझ्यासाठी आणखी एक गोष्ट घडली—
ज्यांच्या नामसाधर्म्यामुळे मला वडील आठवायचे, ती आठवणही आता एका वेगळ्या अर्थाने मनात कायमची कोरली गेली आहे.
नाना, तुमच्या कार्याला आणि कारकिर्दीला सलाम.
भावपूर्ण श्रद्धांजली.
काही ठिकाणी माझ्याकडून त्यांचा एकेरी उल्लेख झाला असल्यास तो केवळ भावना आणि आपलेपणातून झाला आहे. त्या प्रमादाबद्दल क्षमस्व.
आनंदमधला तो प्रसिद्ध संवाद आठवतो आणि म्हणावंसं वाटतं—
“नाना मरे नहीं…
नाना मरते नहीं…” 🙏
@अतुल काटेकर
