भोसरी : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता संकल्पनावरील ४१ वे विभागीय वार्षिक अधिवेशन २०२६ भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात महाराष्ट्रातील १०० हून अधिक औद्योगिक संस्थांमधील १३०० हून अधिक स्पर्धक, व्यवस्थापक आणि गुणवत्ता क्षेत्रातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात ३०० हून अधिक केस स्टडीज, ५७ घोषवाक्ये आणि ६३ पोस्टर्स सादर करण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण ३८ परीक्षकांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके तसेच प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन दाना आनंद इंडिया प्रा. लि.चे बिझनेस युनिट हेड बालाजी माळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. समारोपप्रसंगी आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रताप पोपट सोमवंशी, पिंपरी-चिंचवड होमिओपॅथिक असोसिएशनचे माजी शहराध्यक्ष डॉ. संदीप लुणावत, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे चॅप्टरच्या माजी अध्यक्षा व संचालिका डॉ. रजनी इंदुलकर, फोरमचे पदाधिकारी प्रकाश यार्दी, धनंजय वाघोलीकर, अनंत क्षीरसागर, माधव बोरवणकर, परवीन तरफदार, खजिनदार संजीव शिंदे आणि व्यवस्थापक चंद्रशेखर रुमाले उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी क्वालिटी सर्कल चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले. उत्पादन आणि सेवा क्षेत्रात गुणवत्ता, उत्पादकता तसेच कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी क्वालिटी सर्कल हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात विविध संस्थांतील कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील समस्या, त्यावरील उपाययोजना आणि त्यातून साध्य झालेले फायदे यांचे सादरीकरण केले. गुणवत्ता व्यवस्थापन, खर्चात बचत, सुरक्षितता आणि कार्यपद्धतीत सुधारणा या विषयांवरील केस स्टडीज विशेष आकर्षण ठरल्या. या अधिवेशनामुळे विविध उद्योगांतील सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाण-घेवाण होण्यासह कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सतीश काळोखे यांनी केली. सूत्रसंचालन विजया रुमाले आणि संजीव शिंदे यांनी केले, तर आभार डॉ. रजनी इंदुलकर यांनी मानले. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे चॅप्टरचे व्यवस्थापक चंद्रशेखर रुमाले, प्रशांत बोराटे आणि राहिम मिर्झा बेग यांनी विशेष परिश्रम घेतले.