(पिंपरी) : भोसरी येथील रोशल गार्डनसमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तीन खासगी ट्रॅव्हल बसेसना बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत तिन्ही बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली Bhosari Bus Fireनाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘चिंतामणी ट्रॅव्हल्स’च्या एका बसला सुरुवातीला आग लागली. काही क्षणांतच आगीने शेजारी उभ्या असलेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या दुसऱ्या बससह ‘पारसमणी ट्रॅव्हल्स’च्या एका बसलाही कवेत घेतले. त्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग परिसरात पसरण्याचा धोका टळला.
या आगीत तिन्ही बसेस जळून खाक झाल्याने ट्रॅव्हल्स मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे.