Home गुन्हे PCMC Water Cut: पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे नियोजन; गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई

PCMC Water Cut: पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे नियोजन; गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे नियोजन करण्यात येत आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, तर पाणी बचत करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान होणार.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. १५): अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आणि पुढील वर्षी राज्यात पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठ्यातून ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा करता यावा, यासाठी सर्व महानगरपालिका आणि संबंधित संस्थांनी पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार पाण्याचे नियोजन आणि बचतीसाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.

 

पिण्याचे पाणी केवळ आवश्यक कामांसाठी

 

गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने, हिरवळी आणि झाडांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी एसटीपी तसेच जीटीपीमधील प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा. एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

 

वाहनांची धुलाई, टेरेस आणि अंगण धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये. सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृत पिण्याच्या पाण्याचे नळजोड आढळल्यास ते बंद करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. महापालिकेच्या नळजोडाला विद्युत पंप लावून पाणी उपसा केल्यास पंप जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच वॉशिंग सेंटर आणि मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत.

 

नवीन गृहप्रकल्पांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित व्यासाचे नळजोड देण्यात येणार आहेत. व्यावसायिक आस्थापना, बांधकाम प्रकल्प आणि बिगरघरगुती वापरकर्त्यांनी आवश्यक पाण्याची व्यवस्था स्वतः करावी. घरगुती वापर, शाळा आणि रुग्णालये वगळता अन्य कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

 

बांधकामासाठी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर

 

बांधकाम व्यावसायिकांनी बोअरवेलच्या पाण्याऐवजी महापालिकेच्या एसटीपीमधून उपलब्ध होणाऱ्या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीतून अनधिकृतरीत्या पाणी उपसून विहिरीत किंवा टाकीत साठवून टँकरद्वारे विक्री करणाऱ्यांनी हा प्रकार तातडीने बंद करावा. अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

 

जमिनीवरील संपवेल आणि इमारतींच्या पाण्याच्या टाक्यांमधून पाणी वाहून जाणार नाही किंवा गळती होणार नाही, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांमधील गळती निदर्शनास आल्यास पाणीपुरवठा विभागाला कळवावे. भूजलपातळी कमी असल्याने बोअरवेलच्या पाण्याचाही आवश्यक तेवढाच वापर करावा.

 

पाणी बचत करणाऱ्या सोसायट्यांचा सन्मान

 

पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना महापालिकेतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचवेळी विशेष तपासणी पथकांमार्फत पाण्याच्या वापराची पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

 

“आज वाचविलेला प्रत्येक थेंब उद्याची आणि पुढील वर्षाची पाणी सुरक्षितता निश्चित करेल. नागरिकांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा, अपव्यय टाळावा आणि पाणी बचतीच्या प्रयत्नांत महापालिकेला सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00